Tuesday, 8 July 2014




पुणे विद्यापीठाचा 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ' असा नामविस्तार करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्याता आला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आणि विचारांचा आदर्श भावी पिढीसमोर ठेवण्यासाठी पुणे विद्यापीठाचे नामकरण करावे, अशी मागणी राज्यातील विविध मान्यवर आणि सस्थांनी केली होती. याला अनुसरून पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत नामविस्तार करण्याचा ठराव संमत झाला आणि त्याला विद्यापीठाच्या विविध प्राधिकारणांची मान्यता मिळाली.

पुणे विद्यापीठाचे नामकरण म्हणजे महाराष्ट्रातील सांस्कृतिक  आणि परिवर्तनवादी चळवळींचा गौरव म्हणता येईल. वयाच्या १७ व्या वर्षी पहिल्या महिला शिक्षिका बनलेल्या स्वत: सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणे येथे १८४८ मध्ये मुलींसाठी सुरू केलेली पहिली शाळा या दोन्ही गोष्टी महिलांच्या अस्मितेला मोठ्या आदराने उंच शिखरावर घेवून जाणाऱ्या ठरलेल्या आहेत. हे मैलाचे दगड घट्ट करण्यासाठी तात्यासाहेब भिड़े याच्या बुधवार पेठेतील वाड्यात फुले दांपत्याने भारतातील पहिली मुलींची शाळा सुरु केली. तर समाजाच्या विरोधामुळे शिक्षक मिळणे कठीण झाल्यामुळे महात्मा फुले यांनी पत्नी सावित्रीबाई यांना शिकवून शिक्षिका केले. अशा प्रकारे समर्पण, त्याग, अन्यायाविरूद्ध सकारात्मक चळवळी स्वावलंबनातून उत्तर, विरोधकर्त्याला हिंसक विरोध करता आदर्श देण्याचा वैचारीक दृष्टिकोण ही मूल्ये स्वत:मध्ये रुजविण्यात आपल्या कृतीतून समाजामध्ये पसरविण्यात महात्मा ज्योतिबा फुले क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांचे अनमोल योगदान आहे.

डॉ. मा. गो. माळी यांच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले या पुस्तकातील पान क्रं. ३२ वरील खालील प्रमाणे दिलेला उतारा आजच्या आधुनिक स्त्रीला अन्यायाविरूद्ध लढण्यास आजही बळ देतो...

क्रांतिज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले या पुस्तकातून...
भटभिक्षुकांच्या प्रखर विरोधातून मुलींच्या शाळा चालू झाल्या. मुलींची संख्या वाढू लागली आणि महात्मा फुल्यांनी तयार केलेला अद्ययावत अभ्यासक्रम उत्तम रीतीने सावित्रीबाई राबवू लागल्या. धर्मबुडवी, बाडगी, कैदाशीन, अशा शब्दांनी सावित्रीबाईंची रोज अवहेलना होऊ लागली. टोळकी जमून रस्त्याने जातायेतांना शिव्या देणे, अर्वाच्य बोलणे, म्हारीण म्हणणे, शेनमारा करणे असे प्रकार हरघडी घडू लागले. परंतु सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. ज्या समाजातील मुला-मुलींची आपण सेवा करतो, ते एक देवकार्य असल्यामुळे सनातन्यांकडून होणाऱ्या छळाला त्यांनी जरासुद्धा भीक घातली नाही. थोर विभूतींनाच हे शक्य आहे आणि सावित्रीबाई खरोखरच थोर विभूती ठरतात.

असाच आणखी एक बिकट प्रसंग सावित्रीबाईंच्यावर ओढवला. नित्याप्रमाणे शाळेकडे जाताना एक धटिंगण रस्त्यात आडवा येऊन उभा राहिला. शाळा बंद करण्याची त्याने धमकी दिली. अब्रू घेण्याचा पवित्रा त्याने घेतला. सावित्रीबाईंनी क्षणभर विचार केला. वाघिणीसारखे तिचे डोळे चकाकले. पाठोपाठ त्या धटिंगणास दोन थपड़ा दिल्या. जबरदस्त प्रहाराने तो धटिंगण मुकाट्याने तोंड लपवून बाजूला गेला. लोकांची ही गर्दी झाली. पुण्यात चर्चेला हा एक विषय सुरू झाला. तेव्हापासून सावित्रीबाईंना होणारा त्रास एकदम बंद झाला. महात्माफुल्यांप्रमाणेच सावित्रीबाईंचाही पुण्यात एक प्रकारचा दरारा निर्माण झाला.

अशा प्रकारे स्व:कर्तुत्वातून किर्ती स्थापित करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन! आणि 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ' या नामकरणातून प्रेरणा घेवून परिवर्तनवादी युवा पिढी निर्माण होवो हिच मनोकामना!

Friday, 4 July 2014



पीएसएलव्ही सी-२३ च्या यशस्वी उड्डाणाबद्दल सर्व भारतीयांचे शास्त्रज्ञांचे मन:पुर्वक अभिनंदन!



भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने आपण प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असे यश मिळविले आहे. स्वदेशी बनावटीच्या 'पीएसएलव्ही सी-२३' या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक यानाच्या माध्यमातून जर्मनी, कॅनडा, फ्रान्स सिंगापूरचे पाच उपग्रह यशस्वी प्रक्षेपण करून त्यांना त्यांच्या कक्षेत प्रस्थापित केले आहे.

देश वैज्ञानिक क्षेत्रात आत्मनिर्भर होत असल्याचे हे सूचक उदाहरण आहे. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी याची अत्यंत जरूरी आहे. भारतीय शास्त्रज्ञांच्या या कर्तबगारीचे एक भारतीय म्हणून आपण सर्वांनी कौतुक केले पाहिजे. प्रत्येक भारतीयांद्वारे होणारे कौतुक हीच शास्त्रज्ञांना त्यांच्या पुढील कामासाठी मोठी प्रेरणा असते.

देशाच्या दुर्गम भागात राहणारा जनसामान्य नागरिक ते विकसित शहरातील व्यक्ती अशा सर्वांचे जीवनमान उंचावण्यासाठी, गोरगरीबांच्या मूलभूत गरजा भाविण्यासाठी याप्रकाराच्या मोहिमा नियमित होणे महत्वाचे आहे. या मोहिमांच्या अवकाशातील उपग्रहाच्या माध्यमातून देशाच्या भौगोलिक इतर अनेक परिस्थितीचा अभ्यास होण्यास मोलाचा हातभार लागतो. आणि हे सर्व घटक अभ्यासूनच देशाची विकासाची अपेक्षीत धोरण तयार होत असतात.

जसा देशातील एका व्यक्तीचा होणारा विकास हा देशाच्या विकासात मोलाचा घटक ठरत असतो, तसाच देशाचा होणारा विकास हा प्रत्येक व्यक्तीच्या विकासात महत्वाचा घटक ठरत असतो. तेव्हा अभिमान बाळगूया आपल्या शास्त्रज्ञांचा आणि आपण भारतीय असल्याचा!


ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिज जिंकल्याबद्दल साइना नेहवाल हिचे, तसेच इजिप्त येथील आयबीएसएफ ६-रेड जागतिक स्नूकर चैम्पियनशिप जिंकल्याबद्दल पंकज अडवाणी याचे सुद्धा हार्दिक अभिनंदन!

आम्हा भारतीयांना या युवा खेळाडूंचा अभिमान आहे. नेहमी प्रकाशझोतातील खेळांचे कौतुक करणारे आपण सर्वजन या खेळांना व अशा खेळाडूंना सुद्धा प्रेरणा मिळेल इतके लाईक द्यायला शिकुया.

यातूनच आपला भारत भक्कमपणे निर्माण होणार आहे. युवा शक्तीला प्रेरणा हीच देशाच्या सशक्तीकरणाची खरी आराधना आहे. युवांना सकारात्मक दिशेला घेवून जाण्यासाठी सर्व भारतीयांनी सर्व प्रकारच्या खेळांचे व त्यात सहभागी सर्व युवा खेळाडू यांचे अभिनंदन करणे ही काळाची गरज आहे. भरकटत जाणाऱ्या युवांची ऊर्जा खेळाच्या माध्यमातून अभिव्यक्त झाली तर हा आपला भारत देश जगभरात खेळाच्या क्षेत्रात नक्कीच सर्वात आधी महासत्ता बनेल. म्हणूनच सलाम करुया सर्व भारतीय खेळाडूंना आणि अभिमानाने कौतुक करुया त्यांच्या अथक परिश्रमांनी संपादन केलेल्या ध्येयाचे.