Tuesday, 8 July 2014




पुणे विद्यापीठाचा 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ' असा नामविस्तार करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्याता आला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आणि विचारांचा आदर्श भावी पिढीसमोर ठेवण्यासाठी पुणे विद्यापीठाचे नामकरण करावे, अशी मागणी राज्यातील विविध मान्यवर आणि सस्थांनी केली होती. याला अनुसरून पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत नामविस्तार करण्याचा ठराव संमत झाला आणि त्याला विद्यापीठाच्या विविध प्राधिकारणांची मान्यता मिळाली.

पुणे विद्यापीठाचे नामकरण म्हणजे महाराष्ट्रातील सांस्कृतिक  आणि परिवर्तनवादी चळवळींचा गौरव म्हणता येईल. वयाच्या १७ व्या वर्षी पहिल्या महिला शिक्षिका बनलेल्या स्वत: सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणे येथे १८४८ मध्ये मुलींसाठी सुरू केलेली पहिली शाळा या दोन्ही गोष्टी महिलांच्या अस्मितेला मोठ्या आदराने उंच शिखरावर घेवून जाणाऱ्या ठरलेल्या आहेत. हे मैलाचे दगड घट्ट करण्यासाठी तात्यासाहेब भिड़े याच्या बुधवार पेठेतील वाड्यात फुले दांपत्याने भारतातील पहिली मुलींची शाळा सुरु केली. तर समाजाच्या विरोधामुळे शिक्षक मिळणे कठीण झाल्यामुळे महात्मा फुले यांनी पत्नी सावित्रीबाई यांना शिकवून शिक्षिका केले. अशा प्रकारे समर्पण, त्याग, अन्यायाविरूद्ध सकारात्मक चळवळी स्वावलंबनातून उत्तर, विरोधकर्त्याला हिंसक विरोध करता आदर्श देण्याचा वैचारीक दृष्टिकोण ही मूल्ये स्वत:मध्ये रुजविण्यात आपल्या कृतीतून समाजामध्ये पसरविण्यात महात्मा ज्योतिबा फुले क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले यांचे अनमोल योगदान आहे.

डॉ. मा. गो. माळी यांच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले या पुस्तकातील पान क्रं. ३२ वरील खालील प्रमाणे दिलेला उतारा आजच्या आधुनिक स्त्रीला अन्यायाविरूद्ध लढण्यास आजही बळ देतो...

क्रांतिज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले या पुस्तकातून...
भटभिक्षुकांच्या प्रखर विरोधातून मुलींच्या शाळा चालू झाल्या. मुलींची संख्या वाढू लागली आणि महात्मा फुल्यांनी तयार केलेला अद्ययावत अभ्यासक्रम उत्तम रीतीने सावित्रीबाई राबवू लागल्या. धर्मबुडवी, बाडगी, कैदाशीन, अशा शब्दांनी सावित्रीबाईंची रोज अवहेलना होऊ लागली. टोळकी जमून रस्त्याने जातायेतांना शिव्या देणे, अर्वाच्य बोलणे, म्हारीण म्हणणे, शेनमारा करणे असे प्रकार हरघडी घडू लागले. परंतु सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. ज्या समाजातील मुला-मुलींची आपण सेवा करतो, ते एक देवकार्य असल्यामुळे सनातन्यांकडून होणाऱ्या छळाला त्यांनी जरासुद्धा भीक घातली नाही. थोर विभूतींनाच हे शक्य आहे आणि सावित्रीबाई खरोखरच थोर विभूती ठरतात.

असाच आणखी एक बिकट प्रसंग सावित्रीबाईंच्यावर ओढवला. नित्याप्रमाणे शाळेकडे जाताना एक धटिंगण रस्त्यात आडवा येऊन उभा राहिला. शाळा बंद करण्याची त्याने धमकी दिली. अब्रू घेण्याचा पवित्रा त्याने घेतला. सावित्रीबाईंनी क्षणभर विचार केला. वाघिणीसारखे तिचे डोळे चकाकले. पाठोपाठ त्या धटिंगणास दोन थपड़ा दिल्या. जबरदस्त प्रहाराने तो धटिंगण मुकाट्याने तोंड लपवून बाजूला गेला. लोकांची ही गर्दी झाली. पुण्यात चर्चेला हा एक विषय सुरू झाला. तेव्हापासून सावित्रीबाईंना होणारा त्रास एकदम बंद झाला. महात्माफुल्यांप्रमाणेच सावित्रीबाईंचाही पुण्यात एक प्रकारचा दरारा निर्माण झाला.

अशा प्रकारे स्व:कर्तुत्वातून किर्ती स्थापित करणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन! आणि 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ' या नामकरणातून प्रेरणा घेवून परिवर्तनवादी युवा पिढी निर्माण होवो हिच मनोकामना!

No comments:

Post a Comment