नाशिकच्या विकासासाठी कटिबद्ध होऊ या !
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत घडणार्या आधुनिक बदलांची जाणीव नाशिकने स्वीकारली असून औद्योगिकीकरणाच्या क्षेत्रात बहुराष्ट्रीय कंपन्यांनी नाशकात जोमाने शिरकाव केला आहे ही अर्थकारणाच्या नव्या क्रांतीची चाहूल म्हणावी लागेल. ‘मेट्रो सिटी’ चा नवा चेहरा घेऊन नवनवीन आव्हानांचा स्वीकार करण्यात नाशिक अग्रेसर ठरले आहे. संपन्न आणि गतीशील परिवर्तनाचा नवा विकासात्मक पर्याय नाशिकने आपलासा केला आहे. गोदाकाठच्या पवित्र संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याबरोबरच नाशिक आपली स्वतंत्र ओळख टिकवून आहे हेही मौलिक ठरावे. मॉल संस्कृतीच्या नव्या जीवनशैलीशी समांतर जाणीवही येथे विकसित होत आहे. आर्थिक उलाढालींचा वेग तर पुण्या-मुंबईपेक्षा काकणभर जास्त राखण्यात नाशिक सरस ठरले आहे हे अभिमानास्पद आहे.
आधुनिक ते ग्लोबल नाशिक अशी ओळख निर्माण केलेल्या नाशिकने संस्कृती आणि परंपरांचे जाणीवपूर्वक जतन केले आहे. कोणत्याही कल्याणकारी शहराची रचना ही विकासात्मक दहा स्तंभावर आधारित असते. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, पाणी, शिक्षण, शेती, उद्योग, रोजगार आणि वाहतूक या दहाही क्षेत्रात आज नाशिकने लौकिक संपादन केला आहे. ‘अर्थव्यवहाराचे सहकारीकरण’ आणि ‘यशस्वी औद्योगिकरण’ ह्या दोन बाबींचा नाशिकच्या विकासात महत्त्वाचा वाटा आहे. साहित्य, संस्कृती, शिक्षण, समाजकारण, व्यापार, उद्योग यांची वैभवशाली परंपरा असलेल्या आजच्या नाशिकची झेप पसरटपणाकडे होत असली तरी ती झेप नव्या स्पंदनांची हाक तर आहेच त्याचबरोबर शहराने आपले ‘सत्व’ही जोपासले आहे, हे महत्त्वाचे ठरावे. येथील विकासाचा वेग नव्या जीवन जाणीवांशी स्पर्धा करतच रोज नवे प्रश्न घेऊन समोर येत आहे. आर्थिक क्रांतीची बीजे रोवली गेली ती येथे सहकाराच्या माध्यमातूनच तो विकासाचा वटवृक्ष आज गरज म्हणून जनमाणसात रूजला आहे.
नाशिकमधील काही मूलभूत विकासा संदर्भात रचनात्मक काम करण्याची गरज आहे. कचरा व्यवस्थापनासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. पाथर्डी येथे कचर्याची विभागणी करून सातपूर, अंबड, पंचवटी, गंगापूर या ठिकाणी कचरा डेपो सुरू करावेत. त्यामुळे खत निर्मिती, बायोगॅस प्रकल्पास चालना मिळू शकते. जल प्रदुषणासारख्या भेडसावणार्या प्रश्नांची दाहकता लक्षात घेवून गोदावरी विकासासाठी व नासर्डीच्या स्वच्छता निर्मूलनासाठी किमान पुढील 25 वर्षांचे नियोजन करण्याची आवश्यकता आहे कारण तीही जनतेच्या आरोग्य रक्षणाशी निगडित समस्या आहे. त्यासाठी केंद्र शासनाकडे आर्थिक मदतीसाठी पाठपुरावा करणे, जनहितासाठी महत्त्वाचे ठरावे. नागरिकांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात यावेत. ‘हरित नाशिक, सुंदर नाशिक’ सारख्या उपक्रमांतून पर्यावरण संतुलनाची रक्षणाची चळवळ उभी करावी, रेन वॉटर हार्वेस्टींग करावे. लोक प्रशासन व महापालिका यांच्या समन्वयातून मूलभूत अडीअडचणीं संदर्भात सुसंवाद होणेही गरजेचे आहे. विकासाविषयी सजगता व नियोजनबद्ध प्रगतीचा मार्ग निवडणे यासाठी महत्त्वाचे आहे.
मुंबई-पुण्यात जितक्या वेगाने आय.टी.हब सुरू झाले आहेत तितक्या वेगाने नाशकात माहिती व तंत्रज्ञान शिक्षणाचा विकासाला गती मिळालेली नाही हे आपल्याला मान्य करावे लागेल. म्हणूनच आय.टी.पार्कसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी. अनेक मोठमोठ्या माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्या नाशिकमध्ये येण्यास इच्छूक आहेत याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. आधुनिकता जोपासणारे शहर म्हणून नाशिकची ओळख आणखीच उजळून जाईल हे मात्र निश्चित. उद्याच्या प्रगतशील भविष्याचा वेध घेण्यासाठी नवी पिढी घडविण्याचे आव्हान पेलण्यासाठी जोरदार पावले उचलावी लागणार आहेत. याबरोबरच विविध भाषांतील अभिजात साहित्य असलेले सुसज्ज मध्यवर्ती ग्रंथालय सुरू करणे कला-संस्कृतीच्या विकासाला पूरक ठरेल.
(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष-विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअॅप : 8390035035
ई-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट :vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur
No comments:
Post a Comment