डॉ. पतंगराव कदम - संवेदनशील मनाचा नेता
डॉ. पतंगराव कदम एक उत्तम संघटक, सामाजिक कार्याची सखोल जाण, आणि तळागाळातील जनतेला शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी झटणारे एक अभ्यासू व्यक्तीमत्व होतं. पतंगरावांनी आपले शिक्षण प्रतिकुल परिस्थितीत पूर्ण केले आणि शिक्षण ही मूलभूत गोष्ट आहे, या जाणीवेतून कार्य केले. त्यांच्या ह्या प्रयत्नांची मुहुर्तमेढ म्हणजे ‘‘भारती विद्यापीठ’’ आहे. प्रत्येक वंचिताला, गरजूला शिक्षण हा विचार त्यांनी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने रूजवला. त्याचा आज वटवृक्ष झाला आहे. सहकार क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी भरीव प्रयत्न केले. सामान्य माणसाला आर्थिक पत मिळावी आणि त्यांचे जगणे सुखकर व्हावे, आर्थिक सबलीकरण व्हावे यासाठी सहकारासाठी त्यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतले. नवनव्या प्रगत संकल्पना शिक्षण व सहकारासाठी त्यांनी रूजविल्या. ‘कृतीशीलता’ हा महत्वपूर्ण गुण डॉ.पतंगरावांमध्ये होता.
महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात वनमंत्री, मदत व भुकंप पुर्नवसन, उद्योग, महसुल अशा महत्वाच्या खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली. आणि आपल्या उत्कृष्ठ कार्यशैलीने ठसा उमटवला. भारती विद्यापिठाबरोबरच सहकारी साखर कारखाना, सुतगिरणी, ग्राहक भांडारे, मल्टी शेड्युल्ड बँक स्थापन करून जनसामान्यांच्या हितासाठी कार्य केले, हे फार मोठे योगदान आहे.
दिलदारपणा व दुरदृष्टी असलेला प्रभावशाली नेता ही ओळख त्यांनी निर्माण केली. यासोबतच समाजकारणाची उपजत प्रेरणा त्यांच्यात होती. एस.टी. महामंडळाचे सदस्य असतांना पतंगरावांनी ‘‘गाव तिथे एस-टी’’ ही संकल्पना रूजविण्यासाठी प्रयत्न केले. यातून सामाजिक कार्य करण्याचे व्यक्तिमत्व समोर येते.
परखड व रोखठोकपणा हा पतंगरावांचा स्वभावगुण होता. त्याचबरोबर खुमासदार शैलीतील वक्तृत्व कला ही त्यांनी जोपासली त्यांच्या भाषणासाठी कायमच गर्दी होत असे.
आपल्या कर्तृत्वाने, समाजकारणात महत्वपूर्ण मुद्रा उमटवणार्या पतंगराव कदम यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष-विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअॅप : 8390035035
ई-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur
No comments:
Post a Comment