Monday, 12 March 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

यशवंतराव चव्हाण - महाराष्ट्राचे थोर शिल्पकार
(12 मार्च 2018-105वी जयंती)
देशाचे उपपंतप्रधान राहिलेल्या यशवंतरावांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद, केंद्रीय संरक्षणमंत्रीपद, परराष्ट्रमंत्रीपद, केंद्रीय अर्थ व नियोजनमंत्रीपद, गृहमंत्रीपद अशी मोठी पदे प्रदीर्घ काळ सांभाळताना पाहिलेले जग आपल्या लेखणीतून उभे केले. ते त्यांच्यातील सुसंस्कृत व्यक्तिमत्वाची ओळख करून देते. समोरच्याच्या काळजाला हात घालण्याची विलक्षण वक्तृत्वशैली त्यांना लाभली होती. अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचे यशवंतराव आपल्या विरोधकांचा उल्लेखही ‘माझे विरोधी मित्र’ असा करीत. हा उपजत हळवेपणा असला, तरी प्रसंगी ‘हिमालयाच्या पाठीशी सह्याद्रीला खंबीरपणे’ उभे करण्याची उत्स्फूर्तताही त्यांच्यात होती.
‘जनतेपेक्षा मोठे कोणतेही सरकार असू शकत नाही’ असे यशवंतराव म्हणत. ही भावना 1942 च्या लढ्यात हजारो लोकांना मामलेदार कचेरीवर तिरंगा फडकावताना त्यांच्या मनात आली आणि ती अखेरपर्यंत घट्ट राहिली. त्यामुळेच मराठी अस्मितेला कायम जपणारे यशवंतराव संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पाहून ते प्रत्यक्षात आणू शकले. त्याचबरोबर, मायमराठीच्या हाती झोळी नव्हे, तर वीणाच असावी, यासाठी व्यवहारवादी भूमिका घेण्याची दृष्टीही त्यांच्याकडे होती. त्यामुळेच ग्रामीण जीवन गतिमान करण्याचा पाया त्यांनी प्रथमपासूनच रचला. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर ऑगस्ट 1960 मध्ये विधानसभेत त्यांनी ‘लोकशाहीचे नियोजन’ या विषयावर विचार मांडले होते. सामाजिक सुखसोयींबरोबरच शिक्षण हेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी त्यावेळी ठासून सांगितले. उद्योग, शेती आणि शिक्षण ही त्यांच्या शासकीय धोरणाची त्रिसूत्री होती. त्यामुळेच ‘ज्ञान ही शक्ती, विद्या ही ऊर्जा आणि शिक्षण हे सिंचन’ आहे असे सांगण्याची दृष्टी त्यांच्याकडे होती. कामगार व शेतकर्‍यांना शिक्षित, संघटित केल्याशिवाय देशाची प्रगती अशक्य आहे, हे स्वत: उच्च विद्याविभूषित असलेल्या यशवंतरावांना खूप आधीच कळले होते. म्हणूनच महाराष्ट्राची वाटचाल पुरोगामीपणाकडेच राहावी, यासाठी त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांची फळे आज चाखायला मिळत आहेत.
यशवंतराव चव्हाण यांच्या समग्र जीवनाचा आढावा घेणे म्हणजे एखाद्या महाकाव्याचा धांडोळा घेण्यासारखे आहे. त्यांचे विचार, त्यांची कार्यपद्धती, त्यांचा व्यासंग, त्यांचे द्रष्टेपण याविषयी सातत्याने लिहिले बोलले जाते. यशवंतराव चव्हाण यांचे संपूर्ण आयुष्य अत्यंत व्यामिश्र अनुभवांनी भरलेले आहे. त्यांच्या बालपणातील जडणघडणीचा काळ आजही अनेकांना प्रेरक ठरू शकतो. जगण्याची उमेद वाढवू शकतो. 12 मार्च 1913 ते 25 नोव्हेंबर 1984 या कालावधीत हे जनमान्य नेतृत्व या भूतलावर अस्तित्वात होते. त्यांचा साधेपणा, सच्चेपणा, मानवीय भावभावनांची श्रीमंती मिरविणारं त्यांचं करुणार्द्र हृदय आणि माणसांवर निरातिशय प्रेम करणारं त्यांचं विशाल मन प्रत्येकाने जपून ठेवले आहे.

(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअॅप : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

No comments:

Post a Comment