Monday, 16 April 2018

मी नाशिककर... नाशिकसाठी सर्व काही...

TOGETHER FOR NASHIK
‘महामानवाचे विचार व हरीत नाशिक’

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचा, बंधुत्वाचा संदेश दिला. लोकशाही, मूलभूत हक्क यांविषयी विचार मांडले, नवी दृष्टी दिली. याच बरोबर डॉ. आंबेडकरांना कृषी व्यवस्थेची उत्तम जाण होती. सामूहिक शेतीचे ते पुरस्कर्ते होते. ग्रामीण भागात विखुरलेला समाज एकसंध करायचा तर शेती व्यवसायाचं चित्र बदललं पाहिजे. याबाबत ते आग्रही होते. शेती हा ग्रामीण भागातील आर्थिक विकासाचा केंद्रबिंदू आहे. अनेकांना ते रोजगाराचे माध्यम आहे. त्यामुळे शेतीकडे बघण्याचा दृष्टीकोन हा उद्योग म्हणून असला पाहिजे. ही त्यांची ठाम धारणा होती. इतक्या दूरदृष्टीने व सखोलतेने त्यांनी शेतीकडे बघितले. सर्वसामान्यांच्या विकासाकडे ते कायमच आपुलकीने आस्थेने बघत. हे सांगण्याचे कारण की डॉ. बाबासाहेब जयंतीनिमित्त दिंडोरी रोडवरील गोरक्षनगर मित्र मंडळाने एक अभिनव उपक्रम केला. डी.जे.ला मिरवणूकीला दूर सारत नवा आदर्श दिला. तेथील कार्यकर्त्यांनी वृक्षारोपणाचा उपक्रम राबवला व वृक्षसंवर्धनाची शपथ घेतली. 

डॉ. बाबासाहेबांच्या कृषी विषयक विचारांना कृतीशीलतेने जपण्याचाच हा उपक्रम आहे. असे म्हटल्यास वावगे ठरू नये. आज नाशिकसारख्या महानगरात प्रदुषणाने विळखा घालायला सुरूवात केली आहे. वाढते औद्योगिकरण, वाहतूक यामुळे प्रदुषणात वाढ होत आहे. यासाठी महामानवाच्या विचारातून विकासाला नवी दिशा मिळू शकते हा वस्तुपाठ यातून समोर आला आहे. ‘सुंदर नाशिक-हरीत नाशिक’ या संकल्पनेला यातून बळ मिळेल. हा आदर्श सर्व नाशिककरांनी घ्यावा.


(विश्वास जयदेव ठाकूर)
संस्थापक अध्यक्ष
विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक
मोबाईल : 9822750033/9422272888
वॉट्सअ : 8390035035
-मेल : vishwasjthakur@gmail.com
वेबसाईट : vishwasthakur.com
फेसबुक : vishwasthakurofficial
ट्विटर : @vishwasjthakur

No comments:

Post a Comment